आज जागतिक महिला दिन , समस्त पुरुषवर्गाकडून समस्त स्त्री वर्गाचे गोडवे गायचा दिवस, तिची कृत्यग्नता मानण्याचा दिवस. सकाळपासून सगळा सोशल मीडिया भरभरून वाहतोय. वेगवेगळे संदेश इकडे तिकडे फिरत आहेत. काही कौतुकाचे, काही प्रोत्साहनाचे तर काही चक्क चेष्टेचे सुद्धा. सकाळपासून मी सुद्धा त्या गंगेत पोहत होतो आणि सगळ्या स्त्री वर्गाला भरभरून शुभेच्छा देत होतो. पण आज वाचलेल्या एका पद्य आणि एका गद्य लिखाणाने खरंच मला बरेच अंतर्मुख केले. एका कवितेत स्त्री च्या सौन्दर्याची महती होती आणि तिला खरंच काय हवेय , तिच्या लेखी सुख आणि समाधान म्हणजे काय हे खूप सुबकरित्या मांडलेले तर दुसऱ्या गद्यात एक जळजळीत, दाहक आणि वेदनादायक वास्तव मांडलेले.
दोन्ही लिखाणे खूप छान होती पण वाचल्यावर मला कळेना,सकाळपासून जो शुभेच्छांचा महापूर वाहतोय तो किती खरा आणि किती खोटा कि आपण फक्त औपचारिकता पूर्ण करतोय, सगळ्यांचीच.
स्त्री हि कायमच सुंदर असते, ती कायम पुरुषापेक्षा मानसिकदृष्ट्या सबळ असते , कधी कधी तर शारीरिकदृष्ट्या सुद्धा पण मग तिचे वर्णनं कायम अबला म्हणूनच का करतात कि पुरुषांना एखादा न्यूनगंड असतो कि ती सबला आहे हे मान्य केल तर ती आपल्यावर अधिराज्य गाजवेल.
तस बघितलं तर एका स्त्रीला जितकी एका पुरुषाची गरज असते त्या पेक्षा कैकपटीने पुरुषाला एका स्त्रीची गरज असते. वेगवेगळ्या रूपात ती स्त्री त्याच्या आयुष्यात येते. आधी जन्मदात्री आई मग एक खोडकर पण प्रेमळ बहीण त्यानंतर एक मनाला भिडणारी मैत्रीण आणि पुढे जीवाला जीव देणारी सहचारिणी आणि हो अजून एक रूप म्हणजे मुलगी जी या सगळ्या जणींचे वर्णन केलय त्यातल थोडं थोडं घेऊन आलेली.
स्त्रीच्या त्या प्रत्येक रूपाचा प्रत्येक पुरुष्याच्या आयुष्याच्या एकेक टप्प्यावर प्रभाव असतो आणि त्या प्रभावाशिवाय पुरुषांचे आयुष्य पूर्णत्वाला जाऊच शकत नाही. फक्त एका स्त्रीमध्येच एकाच वेळेला प्रेमाच्या , करुणेच्या आणि ममतेच्या वेगवेगळ्या छटा असतात आणि त्याच प्रेमावर , करुणेवर आणि ममतेवर पुरुष लहानाचा मोठा होतो. मग त्याच स्त्रीचे स्त्रीत्व का मान्य करत नाही तो, देव्हाऱ्यात जर देवी नसेल तर ज्या पुरुषाची पूजा पूर्ण होत नसेल त्याला त्याच देवीच्या एका वंशाची, एका स्त्रीची महती कळू नये हे खरं तर पुरुषांचेच दुर्देव. त्याच्यातला अहंपणा दुखावतो कि खरंच त्याला ती स्त्री मुळातच दुय्यम वाटत असते.
पण आता बऱ्याच प्रमाणात पुरुषांचा बायकांकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय , अर्थात याला पुरुषांच्या बदलत जाणाऱ्या मानसिकतेपेक्षा स्त्रीच्या बदललेल्या मानसिकतेला जास्त श्रेय द्यावे लागेल. तशी ती आधीपासूनच सामर्थ्यवान होती, जिजाऊ पासून अहिल्याबाई होळकरांपासून , झाशीच्या राणीपासून स्वातंत्रतेच्या लढ्यात भाग घेणाऱ्या सरोजिनी नायडु पर्यंत आणि आत्ताच्या इंदिरा गांधींपासून सुषमा स्वराज आणि निर्मला सीतारामन पर्यंतची. स्त्री हि मनाने खंबीर पण हृदयात कोमल आणि हळुवार मनाची पण अलवार प्रेमाची आहे, She has actually broken through the glass ceiling and achieved what she wanted.
खरतर कोणत्याच पुरुषाला तिच्या मनाचा ठाव लागलेला नाही पण तिला आता उमगलय कि तिला काय हवयं. तिला तिच्या जीवनाचा अर्थ आता सापडलाय आणि तिला हवे ते आयुष्य जगताना तीला ना कसली भीती वाटते ना कसली तमा. तीच अन्नपूर्णा , तीच सरस्वती , तीच महालक्ष्मी , तीच दुर्गा, तीच कालीमाता आणि तीच महिषासुर्मार्दिनीसुद्धा , तीच गृहिणी , तीच विदुषी , तीच वीरांगना अशी अष्टभुज नारी. तिच्या जिद्दीला , तिच्या चिकाटीला , तिच्या धैर्याला, तिच्या सामर्थ्याला, तिच्या विद्वात्तेला आणि सगळ्यात महत्वाचे तिच्या त्यागाला माझा मानाचा मुजरा.
तसा मी स्त्रियांच्या बाबतीत कायमच नशीबवान , माझ्या अवती भवती असलेल्या प्रत्येक स्त्रीने माझ्यावर कायमच एक विश्वास दाखवलाय आणि प्रेम आणि माया देताना कधीच हात आखडता घेतला नाही. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुठच्यातरी स्त्री चा प्रभाव आहे आणि ती मग माझी आई , बहीण , बायको रश्मी , मुलगी दीक्षा असो किंवा माझ्या अनेक मैत्रिणींपैकी एखादी असो. या सगळ्या जणी माझ्या आयुष्यात त्या त्या वेळी आल्या नसत्या तर मी आज आयुष्यात जिथे पोचलोय तिथे पोचलोच नसतो.
मी पुन्हा एकदा या जागतिक महिला दिनी समस्त महिला वर्गाला शुभेच्छा देऊन इथेच थांबतो

Deep thoughts
प्रदीप मेस्त्री
08.03.2019
Comments
Post a Comment