माझी मिसळयात्रा
माझी मिसळयात्रा
या नंतर कामासाठी नाशिकला सतत येणेजाणे चालू झाले आणि माझ्याच प्रेयसीची मला नव्याने ओळख झाली किंबहुना असे म्हणता येईल मी माझ्याच प्रेयसीच्या पुन्हा प्रेमात पडलो. नाशिकला आल्यावर मला मिसळ हि किती रोमँटिक प्रेयसी आहे हे कळले, इथे मिसळ नुसती खायची नसते तर तिचा प्रत्येक वेळी उत्सव साजरा करायचा असतो , सगळं काही साग्रसंगीत असते आणि एका नव्या नवेल्या वधूप्रमाणे मिसळ सजून धजून समोर येते. बरोबर करवलीच्या रूपात एक नागली पापड पण येतो आणि काही ठिकाणी मिसळीबरोबर खमंग कांदा आणि बटाटा भजी पण मिळते, तर्री म्हणजे तोंडातल्या आणि पोटातल्या सगळ्या पेशींवर सूड घेण्यासाठी तयार केलेला जाळ. पण त्या तर्रीची चव काय वर्णावी. ताकाचे कित्येक घोट रिचवत मी नाशिकची तर्री ओरपली. नाशिक मध्ये साधना मिसळ , श्यामसुंदर आणि विनयची मिसळ खूप प्रसिद्ध आहे आणि या तीनही मिसळीच्या तीन वेगवेगळ्या ओळखी आहेत. विनयची पूर्णपणे ब्राह्मणि , शयामसुंदरची काळ्या मसाल्यातली तर साधनाची चुलीवरची. आणि हो नाशिकमध्ये मिसळीत कुणी फरसाण घालत नाही तर इथे शेव मिळतो मिसळीत. मी जेंव्हा नाशिककरांना आम्ही मुंबईत मिसळीत फरसाण घालून खातो हे सांगितले तेंव्हा त्या सगळ्यांनी एखाद्या पाणिकमकडे कसे बघावे असा कटाक्ष दिला. साधनामध्ये मिसळ खाणे म्हणजे एखादा सण साजरा करण्यासारखे आहे. खूपच थाटातमाटात मिसळ येते, मुगाची उसळ वेगळी , शेव वेगळे, कांदा वेगळा आणि कोथिंबीर वेगळी. हे सगळं एकत्र करून समोर ठेवलेल्या, तिखट आणि अतितिखट अश्या दोन प्रकारच्या तर्री पैकी जी आपल्याला झेपेल ती उचलून समोर तयार केलेल्या मिश्रणाला यथेच्छ बुडवून काढायचे आणि मग माझ्यासारखे महाभाग गुपचूप त्या तिखट मिसळीत तिची दाहकता कमी करण्यासाठी इतरांची नजर चोरून समोर ठेवलेलं गोड दही थोडंसं मिक्स करतात आणि त्या अतिशय चविष्ट, इतकी कि हे लिहिताना सुद्धा तोंडाला पाणी सुटले त्या मिसळीचा आस्वाद घेतात, मध्येच समोर असलेल्या नागली पापडाचा एखादा तुकडा मोडून तोंडात टाकायचा आणि डोळ्यातून आणि नाकातून आलेले पाणी पुसत, धरतीवरचा स्वर्ग कुठे आहे तर इथेच आहे असे मनातल्या मनात म्हणत यथेच्छ ताव मारायचा. नंतर मस्त गुळातली जिलेबी खाऊन तोंडातल्या भाजून लाल झालेल्या पेशींना थोडा अराम द्यायचा आणि सगळं झालं कि एखाद्या छानश्या वीड्याने सगळ्या समारंभाची सांगता करायची.
आता मी आणि पार्ल्यातल्या मिसळीबद्दल थोडेसे
पार्ल्यात बरीच वर्षे पणशिकरची मिसळ खाल्ली, खरतर नाशिकची जगप्रसिद्ध मिसळ खाल्ल्यावर पार्ल्यातली मिसळ खाणे म्हणजे जगातली एक मोठी तडजोड करण्यासारखे होते पण मी माझ्या प्रेमासाठी काहीही तयार करायला तयार होतो, पणशीकरची मिसळ खाऊन मी माझे मन मारत होतो आणि अचानक पार्ल्यात बेडेकरांची मिसळ आलीय हे कळल्यावर तिथे तडक धाव घेतली पण तिथे घोर निराशा पदरात पडली आणि मी माझ्या प्रेयसीचे असे धिंडवडे बघण्यापेक्षा पार्ल्यातल्या बेडेकरांची मिसळ कधीही न खायचा निर्धार केला, या नंतर पार्ल्यातच वेगवेगळ्या ठिकाणी मिसळीची चव घेऊन बघितल्यावर , पार्ल्यातल्या पणशीकरांच्याच मिसळीशी एकनिष्ठ राहायचे ठरवले पण एकदा एकदम मामलेदारांची मिसळ पार्ल्यात आल्याचे कळले आणि तडक तिथे धाव घेतली पण तिथे सुद्धा थोडीसी निराशाच पदरात पडली आणि शेवटी पणशीकरांचीच मिसळ छान असे म्हणत बसलो. मध्यंतरी एकदा पार्ल्यातल्या लोकमान्य सेवा संघात मिसळ महोत्सव साजरा झाला पण तिथे जाऊन तिकडच्या तोबा गर्दी मध्ये नुसताच मिसळीचा वास घेऊन आलो आणि बहुतेक तिकडच्या मिसळीचा आस्वाद घेणाऱ्या काही लोकांना पोटशूळ देऊन आलो, काल परवा कॉलेज ग्रुप मध्ये मी पार्ल्यातल्या तमाम चाखलेल्या मिसळीचा विषय छेडला आणि अनिताने मी मराठीची मिसळ खाण्यास सुचविले आणि ती पार्ल्यातली सगळ्यात चांगली मिसळ असल्याची ग्वाहीसुद्धा दिली, मी तडक एका शुभमुहूर्तावर मी मराठीतली मिसळ चाखली आणि एका सुंदर अनुभवाला कित्येक दिवस मुकल्याची जाणीव झाली. खरंच अनिताचे आभार मानावे तितके थोडेच पण आज पुन्हा सचिनने, आपल्या बाबाने अजून एक पार्ल्यातले मिसळ मिळणारे नवीन स्थान सांगितले, जे नरिमन रोडवर आहे. तिथे जायचा योग कधी जुळून येतो ते बघावे लागेल तोपर्यंत पार्ल्यातली सगळ्यात छान मिसळ कोणती हा प्रश्न गुलदस्त्यातच राहील पण या क्षणाला जर पार्ल्यातली सगळ्यात जास्त आवडलेली मिसळ कोणती हा प्रश्न विचारला तर मी "मी मराठी" चेच नाव पुढे करेन पण माझी ऑल टाइम फेवरीट " साधना चुलीवरची मिसळच" असेल.
हा मिसळीचा प्रवास अजून थांबलेला नसून चालूच राहील आणि या प्रवासात अजून खूप वेगवेगळ्या मिसळी खायला मिळतील याची अपेक्षा करतो
प्रदीप
24/02/2019
Comments
Post a Comment