CST दुर्घटना आणि आपण

परवा संध्याकाळी उशिरा नेहमीसारखे व्हाट्सअँप वर टाइमपास करत होतो, अचानक एकाच वेळी जवळ जवळ सगळ्याच ग्रुप मध्ये एकच  संदेश येऊन धडकला. CST ला रेल्वेचा फुटओव्हर ब्रिज कोसळला आणि बरेच जखमी झाल्याची शक्यता.
माझ्यासारख्या कायम कार ने फिरणाऱ्या माणसाला नेमका कोणता तो ब्रिज ते बराचवेळ आठवेना. थोडं डोकं खाजवून विचार करायला लागलो, नेमका कुठेसा हा ब्रिज आहे. माझ्याच सारखी बऱ्याच जणांची अवस्था झाली असेल ज्यांना आपण जगत असलेल्या जगाशिवाय वेगळं काही माहित नसेल. 
असो तो पर्यंत अजून बरेच संदेश येऊन धडकले आणि काहीतरी अतिशय गंभीर आणि वाईट घडलंय याची जाणीव झाली. मग पटापट आलेले सगळे संदेश वाचून काढले. एव्हाना बातमी कळली कि GT हॉस्पिटलमधल्या 2 परिचारिकांनी त्या दुःखद दुर्घटनेत आपला जीव गमावला होता आणि 30 च्या वर लोकं जखमी झालेले. 
मन विषन्न झाले या जाणिवेने कि माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर झालय आणि सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी घरी सुखरूपच येईल याची खात्री नाही. 
व्हाट्सअँप वर सतत अपडेट्स येतच होते आणि एका कुठच्या तरी संदेशात, दुर्घटनेतल्या मृत आणि जखमींची यादी अली. अगदी अधीरपणे आणि धडधडत्या मनाने ती यादी एकदा वरून खालपर्यंत आणि खालून वरपर्यंत वाचून काढली, सुदैवाने माझ्या परिचितांपैकी कुणीच नव्हते त्या यादीमध्ये. एक सुटकेचा निःश्वास सोडून मी पुन्हा व्हाट्सअँप वरचे संदेश चाळू लागलो, एव्हाना त्या दुर्घटनेने संपूर्ण सोशल मीडियाचा ताबा घेतला होता. जागोजागी संताप दिसत होता, आगीचे डोंब उसळले होते, प्रत्येक जण आपापली मते मांडत होता. अगदी बुलेट ट्रेन पासून , महाराजांच्या पुतळ्यापर्यंत कसा पैशाचा अपव्यय होतोय यावर जोरजोरात चर्चा चालू झालेली, सत्ताधारी पक्षाबरोबर असलेले आणि पक्षाविरुद्ध असलेले, सगळ्यांचीच चांगली जुंपलेली. कुणाचं काय चुकलंय आणि नेमका दोष कुणाचा यावर एकदम गरमागरम चर्चा चालू होती. सरकार कसे कुचकामी आहे आणि याआधी एक धडा घेऊनही, बेमुर्वतखोर सरकारने काहीच केले नाही यावरून सरकारला सगळ्यांनीच धारेवर धरले होते. 
या सगळ्याचा थोडा कंटाळा आला म्हणून टीव्ही चालू केला आणि न्यूज चॅनेल बघायला चालू केले , तिथे तर अजून जास्त गोंधळ चालू होता , सगळे न्यूज अँकर एक मोट्ठी ब्रेकिंग न्यूज मिळाल्याने खूपच अतिउत्साहात होते. आपल्या चॅनेल चा TRP वाढावा म्हणून तीच तीच दृश्ये परत परत दाखवून, सगळ्याचाच बीभस्तपणा अजून वाढवत होती, आपल्यालाच सगळं जनतेचा ठेका दिल्यासारखं, सगळ्याच प्रशासनयंत्रणेला धारेवर धरत होती, काही चॅनेल या पूर्वी एल्फिस्टन स्टेशनवरच्या दुर्घटनेची चर्चा करून, काही भरून येत असणाऱ्या जखमा परत ओल्या करत होती. काही सबसे तेज चॅनेल तर आपत्तीग्रस्तांच्या नातेवाईकांपर्यंत पोचून त्यांचा आक्रोश लाइव्ह कव्हर करत होती. एकूण काय तर आधीच दुःखाचे असलेले वातावरण पूर्णपणे भेसूर आणि भयावहः झालेले आणि पुष्कळ दृष्ट्या हि ब्रेकिंग न्यूज चॅनेल्सचा TRP वाढवण्यात पूर्ण यशस्वी झालेली, न्यूज अँकर्स आणि कॅमेरामनने घेतलेली मेहनत फळाला लागत होती. 
मी सगळे शांतपणे आणि तटस्थपणे सगळे ऐकत , बघत आणि वाचतसुद्धा होतो. शांतपणे आणि तटस्थपणे अश्यासाठी म्हणेन कि या सगळ्यात माझ्या किंवा माझ्या परिचितांपैकी कुणाचेच परिजन दुर्घटनाग्रस्त झालेले नव्हते त्यामुळे कशाचे कसलेच सोयरसुतक नव्हते , होते ते फक्त या घटनेवर माझेसुद्धा एक मत जे बाकीच्या सर्वांचे जसे होते.
अचानक मी त्या दुर्घटनाग्रस्तांबद्दल विचार करू लागलो आणि थोडासा अंतर्मुख झालो. त्या सर्वांपैकी कुणालाच मी ओळखत नसल्याने कुणाचा काय बॅकग्राऊंड आहे हे मला माहित नव्हते, त्या दुर्घटनाग्रस्तात , गरीब श्रीमंत कोण आहेत काहीच माहित नव्हतं आणि अचानक विचार करू लागलो कि माझ्यासारख्या कित्येक जणांसाठी हि फक्त एक बातमी असली असती तरी त्या एका दुर्घटनेने काही जणांचे आयुष्य पूर्ण बदलून जाणार होते किंबहुना आयुष्य बदलेले होते. चर्चा करणाऱ्यां अनेक जणांच्या आणि ब्रेकिंग न्यूज देणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या गावीही नसेल कि या एका घटनेने काय काय घडलेय,
या घटनेने कदाचित कुणाच्या घरची कर्ती व्यक्ती गेली असेल किंवा कायमची जायबंदी झाली असेल, कित्येकजनांच्या तोंडचा घास कायमचा हिरावला असेल पण या विषयावर चर्चा करणाऱ्यांपैकी किती जण त्यांच्या रोजच्या जेवणातला एक घास बाजूला काढून ठेवतील आणि त्या दुर्घटनाग्रस्तांना भरवतील.
जगाच्या दृष्टीने हि एक फक्त दुर्घटनाच होती आणि त्या साठी त्या जगातल्या लोकांनी सोशल मीडियावर संबंधितांवर जितकी जमेल तितकी आगपाखड केली , वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून गेले असतील , निषेधाच्या चर्चानी आणि सूचनेच्या लेखांनी. 
पण हे किती दिवस , सरकारने ताबडतोब मदतीची घोषणा केली व एका उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली जी या दुर्घटनेचा अभ्यास करून , सरकारला अहवाल सादर करेल , अर्थातच कधी याबाबत सामान्य जनता नेहमीप्रमाणेच अनभिन्द्य. बाकी व्रुत्तवाहिन्यांचा या सगळ्याशी संबंध पुढची मोठी ब्रेकिंग न्यूज येईपर्यंत आणि बाकीचे माझ्यासारखे, त्यांचा संबंध तर पुढच्या मनोरंजनाच्या क्षणापुरता , नंतर दुसरा टाइमपास आहेच. पुढचे सगळे त्रास आणि लढा फक्त आणि फक्त ते दुर्घटनाग्रस्त आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्याचसाठी, बाकी सगळ्यांचा संबंध तिथेच सम्पला आणि जर उरलाच असेल तर नंतर कधीतरी त्या दुर्घटनाग्रस्तांच्या जखमेवरच्या खपल्या काढण्यापुरता. 
आज कुणीतरी म्हणत होते कि आपण सगळे अतिसहनशील आहोत म्हणून सगळे निमूटपणे सहन करतोय, मी म्हणेन हे सगळं साफ चुकीचे आहे, आपण सगळे अति असंवेदनाशील झालोय म्हणून या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आलोय , जो पर्यंत त्रास आपल्याला होत नाही तोपर्यंत तो त्रास आपल्यासाठी अस्तित्वातच नसतो , सतत डोळ्यावर झापडे ओढून आणि अंगावर गेंड्याची कातडी ओढून फिरताना इतके असंवेदनशील झालोय कि अशी काही घटना घडली कि थोडा वेळ संताप , थोड्या सूचना आणि नंतर फक्त विनोद निर्मिती असते त्या सगळ्या प्रकारावर. 
खरंच कधी आपण यातून धडा शिकणार आणि कधी आपल्याच हक्कांसाठी आपल्याच माणसांबरोबर लढणार कि घरी बसून कायमच या सगळ्यावर खरमरीत चर्चा करणार. 
कधी आपल्या वृत्तवाहिन्यांसाठी या घटनांचे मूल्य एका ब्रेकिंग न्यूज पलीकडे असेल.
कधी आपल्या शासकीय यंत्रणेला जाग येईल आणि काहीतरी करण्यासाठी अश्या दुर्घटनांची वाट न बघता ते सक्रियपणे अश्या दुर्घटना टाळेल.
वरच्या कुठच्याच प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे नाहीत , तुमच्याकडे ती आहेत का ??

🖋 Deep thoughts
प्रदीप मेस्त्री 
16.03.2019

Comments

Popular Posts